नवी दिल्ली -मी काँग्रेसचे पूर्णवेळ अध्यक्ष असल्याचे सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयीचीही माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात निवडणुका होतील अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वर्षभरासाठी तरी काँग्रेसची धुरा सोनियांच्याच हाती राहणार असे चित्र आता दिसत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील नेत्यांचाही सूर बदलल्याचे चित्र बघायला मिळाले. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनियांच्या नेतृत्वावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाम नबींचे बदलले सूर
सोनियांच्या विधानानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचे सूर मात्र लगेच बदलल्याचे चित्र बघायला मिळाले. आम्हाला सोनियांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही असे आझाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी आझाद यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
राहुल गांधींच्या नावाल सर्वांची सहमती
राहुल गांधींच्या नावाला सर्वांची सहमती असल्याचे काँग्रेस नेत्या अंबिका सोनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. पक्षाध्यक्ष होणे ना होणे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे असे सर्वांचे मत आहे. काँग्रेसमध्ये कसलिही फूट नाही. पक्ष एकसंघ आहे. सर्व काँग्रेस नेत्यांना वाटते की राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे. निवडणुकीची प्रक्रिया सप्टेंबर 2022 मध्ये सुरू होईल असे सोनी म्हणाल्या.
राहुल यांचीही सहमती
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष होण्याविषयी विनंती केल्यावर राहुल गांधींनी मी त्यावर विचार करेन असे उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. धोरणात्मक पातळीवर स्पष्टता आपल्याला हवी आहे असे राहुल गांधी यावेळी बोलल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसच्या 'जी 23' गटातर्फे काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका, सध्याची राजकीय परिस्थिती तसेच लखीमपूर खेरीची घटना, शेतकरी आंदोलन, बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक परिस्थिती यावर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेसचे 52 नेते या बैठकीला उपस्थित होते. दिग्विजय सिंह आणि मनमोहन सिंह यांच्यासह पाच नेते बैठकीला उपस्थित नव्हते.
प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आत्मसंयम आणि शिस्तपण गरजेचे आहे. तसेच एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते. त्यांनी माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही, असे सोनिया गांधी बैठकीत म्हणाल्या.
जर तुम्ही मला म्हणण्याची परवानगी दिली, तर मी म्हणते की मी काँग्रेसचा पूर्णवेळ अध्यक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका घ्यायच्या होत्या. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्या घेऊ शकलो नाही. आता पुढील वेळापत्रक लवकर जारी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
लखीमपूर खेरी घटनेवर सोनिया गांधी यांनी भाष्य केले. लखीमपूर खेरीसारख्या घटना भाजपाची शेतकरी आंदोलनाकडे पाहण्याची त्यांची मानसिकता दर्शवत आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना स्पष्टपणे लक्ष्य केले गेले आहे. याचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
राष्ट्रीय मालमत्ता विकणे हाच सरकारचा एक-बिंदू अजेंडा -
अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार एकच मार्ग निवडत आहे, तो म्हणजे अनेक दशकांपासून उभारलेल्या राष्ट्रीय मालमत्ता विकणे. हा त्यांचा एक-बिंदू अजेंडा आहे इंधन दरांनी शंभरी पार केली आहे. घरगुती सिलेंडरचे दर 900 रुपयांवर पोहचले आहेत. खाद्यतेल महागले आहे. यामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे, असे सोनिया म्हणाल्या.
हेही वाचा -अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडे 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली!