हैदराबाद :बेरोजगार असलेल्या आयटी इंजिनियर पतीनं आयटी कंपनीत मॅनेजर असलेल्या पत्नीसोबतच्या वादातून आपल्या चिमुकल्या मुलीचा बळी घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली. कुंदेती चंद्रशेखर असं त्या चिमुकलीचा खून करणाऱ्या नराधम पित्याचं नाव आहे. तर मोक्षजा असं खून झालेल्या दुर्दैवी चिमुकलीचं नाव आहे. कुंदेती चंद्रशेखर आणि हिमबिंदू हे दोघेही पती पत्नी अमेरिकेत काही काळ आयटी कंपनीत उच्च पदावर काम करत होते. काही काळापूर्वीच ते दोघेही हैदराबादला परतले. मात्र हैदराबादला आल्यानंतर पत्नी नामांकित आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती, तर कुंदेती चंद्रशेखरची नोकरी गेल्यानं तो बेरोजगार होता. यातूनच त्यांचा वाद झाल्यानं ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अमेरिकेत करत होते आयटीत काम : कुंदेती चंद्रशेखर विजयवाड्यातील अजितसिंहनगर येथील राहणारा आहे. तर त्याची हिमबिंदू ही भेल परिसरातील चंदननगर परिसरात राहत होती. या दोघांचंही 2011 मध्ये लग्न झालं होतं. कुंदेती चंद्रशेखर आणि त्याची पत्नी हिमाबिंदू हे दोघेही अमेरिकेतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होते. मात्र काही दिवसापूर्वी ते हैदराबादमधील चंदननगर इथं येऊन स्थायीक झाले होते.
पत्नी आयटी कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार : हे दोघंही हैदराबादला आल्यानंतर त्यांनी इथच्या एका नामांकित कंपनीत नोकरी सुरू केली होती. मात्र काही कारणामुळे कुंदेती चंद्रशेखरची नोकरी गेल्यामुळे तो बेरोजगार होता. तर त्याची पत्नी आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होती. त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. या दोघांना आठ वर्षाची मोक्षजा ही मुलगी होती. मात्र वारंवार होणाऱ्या भांडणातून ती सुद्धा त्रस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोघांच्या भांडणातून हिंमबिंदूनं गाठलं माहेर :उच्च शिक्षित असलेल्या या दाम्पत्यात नेहमीच भांडण होत असल्यानं हिमबिंदू कुंदेती चंद्रशेखरला सोडून तिच्या माहेरात राहायला गेली होती. तर त्यांची चिमुकली मुलगी ज्योती विद्यालयात 4 थीच्या वर्गात शिकत होती. चार महिन्यापासून हिमबिंदू ही तिचं माहेर असलेल्या भेल परिसरात राहत होती. आपली नोकरी गमावण्याचं कारण हिमबिंदू असून ती आपल्या मुलीलाही दूर ठेवत असल्यानं चंद्रशेखरला प्रंचंड चिडला होता.
पत्नीसोबतच्या वादातून चिमुकलीचा चिरला गळा :शुक्रवारी कुंदेती चंद्रशेखरनं बाजारातून धारदार ब्लेड विकत आणली. त्यानंतर तो मोक्षजा शिकत असलेल्या ज्योती विद्यालयात गेला. त्यानं मोक्षजाला फोन केला, मात्र तिनं त्याच्यासह जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेला पिता पाहून मोक्षजा गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसली. यावेळी त्यानं तुझी आई माझ्यासोबत नीट का बोलत नाही, असं तिला विचारलं. त्यावर मोक्षजानं तुम्ही तिलाच विचारा असं सांगितल्यानं तो आणखी चिडला. आपल्या मुलीला पत्नी दूर ठेवत असल्यानं ती सुद्धा मुलीच्या सोबत राहू नये, म्हणून तो प्रचंड चिडला होता. मुलीला घेऊन भेल टाऊनशीप परिसरात जाऊन त्यानं चिमुकल्या मोक्षजाचा गळा चिरला. त्यानंतर ती ठार झाल्याची खात्री केल्यानंतर त्यानं तिचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून तो विल्हेवाट लावण्यास नेत असल्याची माहिती वनस्थलीपुरम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त भीम रेड्डी यांनी दिली.
गाडीचा टायर फुटल्यानं मारेकरी लागला हाती :कुंदेती चंद्रशेखर यानं चिमुकलीचा खून केल्यानंतर त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडी आऊटर रिंग रोडवर तारामतीपेठ ते कोहोडला दरम्यान अनेक चकरा मारल्या. अंधार पडल्यानं त्याला मृतदेह टाकून आत्महत्या करायची होती, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. मात्र त्याची गाडीचा टायर फुटल्यानं ती डिव्हायडरला धडकली. त्यामुळे घटनास्थळावर नागरिक जमले. मात्र कारचा अपगात झाल्यानं नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अब्दुलापूरमेटच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होत चौकशी केली. मात्र पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यानंतर त्यांना गाडीच्या डिक्कीत चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानं त्यांनी कुंदेती चंद्रशेखरच्या मुसक्या आवळल्याची माहितीही सहायक पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भीमा रेड्डी, अब्दुलापूरमेटचे पोलीस निरीक्षक मनमोहन, पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराम रेड्डी आणि किशन यांनी पार पाडली.