पाटणा-बिहारची राजधानी पाटणा मध्ये हादरवून सोडणारी हत्येची घटना घडली आहे. रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या एका व्यक्तीने ब्लेडने वार करून पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच नाही तर, या हत्येनंतर आरोपी पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तुलिका लाल आणि अतुल लाल अशी त्या मृतांची नावे आहेत.
पत्नीला कोरोना झाल्याने सुरू होते वाद
प्राप्त माहितीनुसार अतुल लालची पत्नी तुलिका लाल गेल्या 5-6 दिवसांपासून कोरोना बाधित होती. तेव्हापासून दोघांमध्ये खटके उडायला सुरवात झाली होती. सोमवारी देखील त्या दोघांच्या भांडणातूनच अतुलने हे टोकाचे पाऊल उचलले असेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मुलांच्या समोरच घडला प्रकार
पाटणा शहरातील मुन्ना चक्र परिसरातील ओम अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने धारदार हत्याराने अथवा ब्लेडने पत्नीची हत्या केली होती. हा सर्व प्रकार घडत असताना अतुल लालची मुले तिथेच होती. आज सकाळी त्या मुलांनी आई वडिलांमध्ये भांडण झाल्याचे पाहिले होते. त्यांनतर अतुलने पत्नीच्या गळ्यावर आणि कानावर धारदार हत्याराने वार केले. त्यामुळे तुलिका बेशुद्ध होऊन बेडवर कोसळली.
मुलांनी केला वाचवण्याचा प्रयत्न-
या घटनेनंतर मुलांनी लगेच आईला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत तिचा जीव गेला होता. त्याच दरम्यान अतुलने चौथ्या मजल्यावरून उडी मारून स्वतः देखील आत्महत्या केली. अपार्टमेंटच्या गार्डने सांगितले की, अतुल लाल परिवारासह तीन-चार वर्षांपासून तिथे राहात होता.
या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.