मुरादाबाद (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशच्या मुरादाबादजिल्ह्यात मंगळवारी रात्री एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे भांडणानंतर पतीने पत्नीला मिठी मारून तिच्या पाठीवर गोळी झाडली. ही गोळी दोघांच्या शरीरातून आरपार गेली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पती चंदीगड येथे मजुरीचं काम करायचा.
मिठी मारून पत्नीच्या पाठीत गोळी झाडली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील खानपूर गावात अनिक पाल पत्नी सुमन आणि चार मुलांसोबत राहत होता. तो चंदीगडमध्ये राहून मजुरीचं काम करायचा. बिलारी खानपूर या त्याच्या गावी आल्यानंतर अनिक पाल आणि त्याची पत्नी सुमन यांच्यात अनेकदा भांडण होत असे. मंगळवारी रात्री उशिरा पती - पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले. थोड्या वेळाने अनिक पाल त्याच्या पत्नीकडे आला आणि तिला मिठी मारली. पत्नीला मिठी मारल्यानंतर अनिक पाल याने पत्नीच्या पाठीत गोळी झाडली. गोळी दोघांची छाती फाडून बाहेर आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.