नवी दिल्ली - कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाटसह अनेक दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अधक्ष बृजभूषण सिंह यांना हटवण्यासाठी जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडंनी लैंगिक शोषणाचेही आरोप केले आहेत. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या आरोपाने आपण दुखी झाल्याची प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली आहे.
97 टक्के खेळाडूंचा मला पाठींबा :जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणाऱ्या खेळाडूंनी विविध आरोप केले आहेत. मात्र 97 टक्के खेळाडूंचा मला पाठींबा असल्याची माहिती बृजभूषण सिंह यांनी आज दिली. व्नेश फोगाटला मुख्य प्रशिक्षकांबाबत तक्रार होती. त्यामुळे तिने मला मुख्य प्रशिक्षक बदलण्याबाबत सांगितेल होते. मात्र मी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे विनेश फोगाटने आरोप केले असावेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हरियाणा कुस्ती संघात केले बदल :हरियाणातील कुस्ती संघ काही दिवसांपूर्वी बदलण्यात आला होता. त्यानंतर तिथे निवडून आलेला संघाचे मंडळ कार्यरत आहे. मात्र काही लोकांनी क्रीडा मंत्री आणि कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महासंघाची स्थापना केली. त्यांना त्यांच्या निवडलेल्या उमेदवारांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड करायची होती. मात्र याला विरोध केल्यामुळे आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचेही बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.