Human Centric Globalization : ‘वसुधैव कुटुंबकम’ या दोन शब्दात मोठं तत्त्वज्ञान दडलंय. संपूर्ण जग हेच एक कुटुंब असा याचा अर्थ आहे. सार्वत्रिकदृष्ट्या कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी देशकालाच्या सीमा, भाषा आणि विचारसरणीच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा देणारा हा एक सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे. मानव केंद्रित विकासाचं आवाहन भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात आपण संपूर्ण जगाला करत आहे. या पृथ्वीवरील एकच कुटुंब म्हणून या वसुंधरेचं पालनपोषण करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. त्याच दृष्टीकोनातून कुटुंब म्हणून विकासाच्या प्रयत्नात आम्ही एकमेकांना साथ देत आहोत. आजच्या परस्परावलंबी काळामध्ये आपण एकत्रितपणे एकाच सामुदायिक भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे एक निर्विवाद सत्य आहे.
कोरोना नंतरचे बदल - कोरोना महामारीनंतरची जागतिक व्यवस्था ही आधीच्या जगापेक्षा खूपच बदललेली आहे. यामध्ये तीन महत्त्वाचे बदल झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंतच्या जगाच्या जीडीपी-केंद्रित दृष्टिकोनापासून मानव केंद्रित दृष्टिकोनाकडे वळण्याची गरज असल्याची जाणीव वाढली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना सावरताना जागतिक पुरवठा साखळीतील लवचिकता आणि विश्वासार्हतेचं महत्त्व जगानं ओळखलं आहे. तसंच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक संस्थांच्या सुधारणेतून सामुहिक प्रगतीला चालना देण्याची गरज अधोरेखित झाली आहे .
दुर्लक्षितांच्या कल्याणासाठी भारत -भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने या सगळ्या बदलांसाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे. इंडोनेशियामध्ये डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा आम्ही जी-२० चं अध्यक्षपद स्वीकारलं, तेव्हा मी लिहिलं होतं की, आपली मानसिकता बदलणं आवश्यक आहे. विशेषत: जगाच्या दक्षिण भागातील तसंच आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या दुर्लक्षित आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.
प्रगतीची घसरण रोखण्याची गरज - व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट हा १२५ देशांचा सहभाग असलेला भारताच्या अध्यक्षतेखालील उपक्रम हा त्याचाच एक भाग होता. या माध्यमातून ग्लोबल साऊथकडून माहिती आणि कल्पनांचा उहापोह करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. भारताच्या नेतृत्वाखाली यातूनच आमचा आफ्रिकन युनियनला जी-२० चे कायम सदस्य म्हणून समाविष्ट करण्यावर भर राहिला आहे. एका अर्थानं एकमेकांशी जोडलेलं जग म्हणजे आव्हानंही एकमेकांशी जोडलेली आहेत. जागतिक टिकावू प्रगतीचं 2030 चं लक्ष्य गाठण्यासाठी हा मध्यकाळ आहे. याचवेळी ही प्रगती घसरणीला लागल्याची चिंता सर्वांनाच आहे. त्यामुळे या प्रगतीला गती देण्यासाठी जी-२० चा २०२३ कृती आराखडा भविष्यातील दिशादर्शक ठरेल.
विकासाकरता तंत्रज्ञान - प्राचीन काळापासून भारत एक निसर्गानुकूल आदर्श देश राहिला आहे. आजच्या आधुनिक काळातही हवामान उत्तम राखण्यासाठी भारत कृतीशिलतेनं आपला वाटा उचलत आहे. जगाच्या दक्षिण भागातील अनेक देश विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. त्याचवेळी या देशांनी हवामान बदलाचा मागोवा घेऊन समतोल प्रगती साधण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची निकड आहे.
हवामान बदलाशी पूरक दृष्टीकोन - यासाठी नकारात्मक बाबींच्या ऐवजी हवामान बदलाशी लढण्यासाठी काय केलं जाऊ शकतं यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यासाठी पूर्ण प्रतिबंधांचा दुराग्रह सोडण्याची गरज आहे. तसंच अधिक रचनात्मक काम केलं पाहिजे. निरंतर आर्थिक विकासाच्या प्रयत्नात महासागर दूषित होऊ नये यासाठी चेन्नईतील केंद्र कार्यरत आहे. ग्रीन हायड्रोजन इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून भारताच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठी जागतिक परिसंस्था उदयास येत आहे. भारतानं इंटरनॅशनल सोलर अलायन्सची २०१५ साली स्थापना केली. आता, ग्लोबल जैवइंधन अलायन्सच्या माध्यमातून, भारत अर्थव्यवस्थेच्या सर्वंकष फायदेशीर सक्षमीकरणास भारत जगाच्या पाठीशी राहील.