हैदराबाद - रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे याने हैदराबाद पोलिसांना शरण येण्याचा बनाव रचला होता. राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी ही माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. यासंदर्भात माहिती देताना भागवत यांनी सांगितले की, बुधवारी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी फोन करून बाळ बोठे शरण येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तत्पूर्वी बोठे हैदराबादमध्येच असल्याची खात्री झाली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने काही विशिष्ट फोन कॉलवरून त्याची खातरजमा केली होती.
बोठे दिली पोलीस आयुक्तालयात भेट -
गुरुवारी सकाळी 10 वाजता पाटील आडनाव असलेला पुरुष भागवत यांना भेटण्यासाठी आला. त्याबाबतची चिठ्ठी मिळताच राचकोंडाच्या आयुक्तालयातील आपल्या दालनात पाठवण्यास भागवत यांनी सांगितले. तसा निरोप पोहोचण्यापूर्वीच सदर व्यक्ती बॅग घेऊन येतो, असे सांगून पोलीस आयुक्तालयातुन निघून गेला. त्यानंतर लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो पुरुष रिक्षातून गेल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी लगेचच संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता सुरूवातीला त्याने खोटी माहिती दिली. आधी रिक्षावाल्याने लाल दरवाजा सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्या रिक्षावाल्याने खरी माहिती देत लाडबाजार सांगितले. तेवढ्या वेळात तो पळून गेला. दरम्यान, पोलीस आयुक्तालयात आलेल्या त्या व्यक्तीने स्वागत कक्षात दिलेल्या फोन नंबरवर आयुक्त भागवत यांनी फोन लावला. मात्र, तो नंबर बंद असल्याचे लक्षात आले.