नवी दिल्ली -गेल्या एका वर्षभरापासून चीन आणि भारतादरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर सौहार्दपूर्ण वातावरण स्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सिक्किमध्ये दोन्ही देशादरम्यानच्या सैन्यात चकमक टाळण्यासाठी रविवारी उत्तरी सिक्किमच्या कोंगरा ला मध्ये भारतीय सैन्य आणि तिबेट स्वायत्त क्षेत्रातील खंबा दजोंगमधील पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (PLA) एक हॉटलाईन स्थापित केली आहे.
भारतीय लष्काराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रविवारी पीएलए दिवस होता. दोन्ही देशादरम्यान स्थापित केलेली ही सहावी हॉटलाईन आहे. तसेच पूर्व लडाख, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये दोन्ही लष्कारादरम्यान दोन-दोन हॉटलाईन झाल्या आहेत. ही हॉटलाईन दोन्ही देशांदरम्यान शांतता स्थापित करण्यास आणि संवादाला मजबूती देण्यास मदत करेल, असे लष्कारने म्हटलं. हॉटलाईनच्या उद्धाटनादरम्यान दोन्ही लष्काराचे कमांडर उपस्थित होते. हॉटलाईनच्या माध्यमातून मैत्री आणि सद्भावनेचा संदेश अदान-प्रदान करण्यात आला.
वर्ष 2021 च्या सुरवातीला 20 जानेवरी रोजी चीन आणि भारतीय सैन्यादरम्यान सिक्किमच्या नाकू ला मध्ये चकमक झाली होती. चीनी सैनिक भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची घुसखोरी भारतीय जवानांनी रोखली होती. यावेळी अनेक जवान जखमी झाले होते. अरुणाचल प्रदेशापासून ते पूर्व लडाखपर्यंत चीनशी जोडलेल्या वास्तविक नियंत्रण रेखेवर तणावाची स्थिती असते. चीनी सैनिक आक्रमक असल्याने भारतीय जवानांना डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करावे लागते.
सीमावादावर चर्चा -
गेल्या शनिवारी भारत-चीनच्या अधिकाऱ्यांदरम्यान सीमावादावर चर्चेची बारावी फेरी पार पडली. चिनी बाजूने असणाऱ्या सीमेवरील माल्डो या ठिकाणी कॉर्प्स कमांडर स्तरावर सुमारे 9 तास ही बैठक चालली. पुर्व लढाखमधील सीमावाद मिटवण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ही बैठक सकाळी 10: 30 वाजता सुरू झाली आणि 7: 30 वाजता संपली. गलवान खोऱ्यातील सीमावाद मिटला असला तरी भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणांवरून मतभेद आहेत. अलीकडेच, चीनने LAC विवाद संपवण्यासाठी 26 जुलै रोजी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' असल्याने बैठकीची तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली. भारत चीनमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर अनेक चर्चा झाली आहे. भारताची एक इंचही जमीन कोणालाही बळकाऊ दिली जाणार नाही, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले असून त्यानुसारच चीनसोबत सीमावादावर चर्चा सुरू आहे.
गलवान खोऱ्यात हिंसक चकमक -
गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून LAC वर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अनेक चर्चेनंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. परंतु तरीही गोग्रा हाईट्स, हॉट स्प्रिंग असे अनेक मुद्दे आहेत. जेथे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती. ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच वेळी, अनेक चिनी सैनिकही ठार झाले.
हेही वाचा -'सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चीननं प्रामाणिकपणे काम करावं'
हेही वाचा -तवांग सेक्टरमधील सीमेवर आयटीबीपी जवान हाय अलर्टवर