कोलकाता - देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं सारे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाचे तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावळागोंधळ पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगालच्या कल्याणी येथील नेताजी सुभाष कोविड रुग्णायालयात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याचं मृत्यू प्रमाणपत्रदेखील तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी जेव्हा स्मशानभूमीचे कर्मचारी मृतदेह घेण्यासाठी गेले असता. त्यांना रुग्ण जिवंत आढळला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सदर तरूणाच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास झाला.
धंतला पोलीस ठाण्यांतर्गत हिजली येथील रहिवासी असलेल्या सुब्रत कर्मकर (वय 26) यांना ताप आणि छातीत दुखत असल्याने राणाघाट उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कल्याणी येथील एनएसएस कोविड हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले होते.