मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून हॉरर किलिंगची ( Horror Killing In Meerut ) खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या हत्येसाठी 1 लाखांची सुपारी दिली ( Father Gives Contract To Kill Daughter ). संतापलेल्या वडिलांनी फिल्मी स्टाईलमध्ये कट रचला हे विशेष. बाहेरील कंपाउंडर फिल्मी स्टाईलमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि अल्पवयीन मुलीला विषाचे इंजेक्शन देऊन तेथून पळून जातो, अशी घटना चित्रपटात दाखविली जाते. अगदी तसेच या घटनेत घडले आहे. मात्र, सुदैवाने डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेत सहभागी असलेले वडील, कंपाउंडर आणि स्टाफ नर्स यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले.
मेरठच्या कंकरखेडायेथील शिवलोकपुरी येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी रात्री उशिरा कैलाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किशोरवयीन मुलगी कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेल्याचे सांगण्यात आले. तेवढ्यात माकडांनी तिला घेरले. त्यानंतर माकडांच्या भीतीने तिने छतावरून उडी मारल्याने ती जखमी झाली. त्यामुळे जखमी मुलीला त्यांनी कैलाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला पल्लवपुरम येथील फ्युचर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे एक बाहेरील कंपाउंडर फिल्मी पद्धतीने आला आणि त्याने पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन अल्पवयीन मुलीला दिले अन् तो पळून गेला.