शहाजहानपूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यात आज एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे ट्रॅक्टर ट्रॉली पुलाचे रेलिंग तुटून खाली पडली. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त : मिळालेल्या माहितीनुसार, तिलहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरसिंग गावाजवळ हा अपघात झाला. येथे लोक गर्रा नदीचे पाणी घेऊन जात होते. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
बचाव पथक घटनास्थळी दाखल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच त्यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्यात गुंतले आहेत. सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ट्रॉली चालकांनी एकमेकांशी शर्यत लावली होती : एसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, आझमपूर गावात भागवत कथेसाठी लोक गर्रा नदीतून पाणी घेण्यासाठी आले होते. गावातील लोक दोन ट्रॉलीतून जात होते. नदीचे पाणी घेतल्यानंतर ते ट्रॉलीमध्ये बसून गावाकडे परतत होते. दरम्यान, ट्रॉलीच्या चालकांनी एकमेकांशी शर्यत लावली. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रॉलीचा तोल गेला आणि ती पुलाचे रेलिंग तोडून गर्रा नदीत पडली. या ट्रॉलीमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुले असे सुमारे 42 जण बसले होते. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देऊन बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच कोतवाली प्रभारी राजकुमार शर्माही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून सीएचसीमध्ये पाठवले.
हे ही वाचा :Raigad Bus Accident : रायगड बस अपघातावर अमित शाहांचे ट्विट, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त; CM, DCM यांच्याकडून घेतली माहिती