तुमाकुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीची तिचे वडील, भाऊ आणि काका यांनी गळा आवळून हत्या केली. 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचे अनुसूचित जातीतील एका मुलावर प्रेम असल्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे.
तीन आरोपींना अटक : तुमकुरुचे एसपी राहुल कुमार शहापूरवाड यांनी शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणी परशुराम, शिवराजू आणि तुकाराम या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला अनुसूचित जमातीची आहे. ती एका वसतिगृहात वास्तव्यास होती. त्यावेळी ती आणि एक अनुसूचित जातीतील मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडले. मुलगी दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला शोधून काढले आणि 9 जून रोजी तिला घरी आणले.
घरच्यांनी मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला : मुलीने मुलासोबतचे आपले संबंध संपवण्यास नकार दिल्याने तिच्या घरच्यांनी तिला विष पाजण्यास भाग पाडले. मुलीने त्यांना विरोध केला असता तिचे वडील परशुराम, भाऊ शिवराजू आणि काका तुकाराम यांनी दोरीने गळा आवळून तिचा खून केला. विष घेऊन मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आला.