मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मुलीची तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनीची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतलाय. मुलीच्या पालकांची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
या कारणामुळे केली हत्या : या प्रकरणी अधिक माहिती अशी की, या मुलीला कोर्टात प्रियकराच्या बाजूने साक्ष द्यायची होती. याचा राग मनात धरून आई-वडिलांनी तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरमधील गोयला गावचे प्रमुख धरमपाल यांना गावातील रहिवासी विजेंदर आणि त्यांची पत्नी कुसुम यांनी त्यांच्या १९ वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याची माहिती सर्वप्रथम कळाली. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि स्थानिकांच्या मदतीने शनिवारी इंचोडा नदीत मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. अखेर सायंकाळी रतनपुरी येथील भानवाडा गावाजवळील नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल केलाय.