नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वाद सुरूच आहे. आता या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करतो? तमिळनाडूतील एका पवित्र शैव मठाने पंडित नेहरूंना भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून एक पवित्र 'सेंगोल' दिले होते पण त्यांनी ते 'काठी' म्हणून संग्रहालयात पाठवले. काँग्रेस इतिहास बोगस करण्याचे काम करत आहे. काँग्रेसने आपल्या वर्तनाचा विचार करण्याची गरज आहे'.
28 मे रोजी उद्घाटन : नवीन संसद भवनाचे काम सुमारे अडीच वर्षांत पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पायाभरणी केली होती. आता मोदी 28 मे रोजी त्याचे उद्घाटन करणार आहेत. मात्र त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी काँग्रेससह 21 पक्षांची मागणी आहे. तर दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की जेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी संसद भवनाच्या इमारतींचे उद्घाटन करू शकतात तर पंतप्रधान मोदी का करू शकत नाहीत?
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली : संसद भवन उद्घाटनाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. संसद भवनाच्या उद्घाटनाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच अशी याचिका पुन्हा दाखल केल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याचिका का दाखल करण्यात आली हे आम्हाला माहीत आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.