अयोध्या ( उत्तरप्रदेश ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांच्या ५ जूनच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. एकीकडे उत्तरप्रदेशच्या कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह ( BJP MP Brijbhushan Sharan Singh ) यांनी राज ठाकरेंच्या अयोध्येत येण्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीयांशी झालेल्या गैरवर्तनासाठी मनसे प्रमुखांना जबाबदार धरत त्यांनी माफी मागावी अशी मागणी ते करत आहेत. त्यातच आता खरा आणि खोटा रामभक्त असा नवा वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी अयोध्येत मनसेच्या होर्डिंग्जवरून राज ठाकरे यांचे खरे रामभक्त असे वर्णन करण्यात आले होते. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने होर्डिंग्ज लावून खऱ्या- खोट्या रामभक्ताचा मुद्दा उपस्थित केला ( hoarding war between mns and shivsena ) आहे.
या होर्डिंगमध्ये शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. खरे येत आहेत, खोट्यापासून सावध राहा, असे या होर्डिंगमध्ये लिहिले आहे. जून महिन्यात महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे जून महिन्यात अयोध्या दर्शनासाठी येऊ शकतात. त्याचवेळी 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. अयोध्येला येण्यासाठी ट्रेनही बुक करण्यात आली आहे.