भागलपूर -भागलपूरमध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. विश्व हिंदू परिषद, अभाविप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भागलपूरमधील सिनेमागृहाच्या आवारात लावलेले पोस्टर फाडून शाहरुख खानच्या पठाणचा निषेध नोंदवला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोस्टरलाही आग लावल्याने तणाव निर्णाण झाला. पठाण चित्रपटाचे पोस्टर हॉलबाहेर लावल्यानंतर काही तासांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. यानंतर त्यांनी पोस्टर फाडून आंदोलन करण्यास सुरुवात केली.
पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन गोंधळ :शाहरुख खानचा चित्रपट 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहे. विविध संघटनांकडून पठाणच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला जात आहे. भागलपूरमधील अनेक संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवावण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी सिनेमागृहाबाहेर जमलेल्या जमावाने एकमेकांच्या खांद्यावर चढून पोस्टर फाडले आहेत. त्यामुळे भागलपूरमध्ये तणाव निर्माण झाला.
विशिष्ट धर्माला टार्गेट करणारा चित्रपट दाखवला जातो :शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्या आंदोलकाने द काश्मीर फाईल सारखा सत्य दाखवणारा चित्रपट दाखवला जात नाही, हे भारताचे दुर्दैव असल्याचे यावेळी सांगितले. दुसरीकडे ज्या चित्रपटात विशिष्ट धर्माला टार्गेट करून निर्लज्जपणे भगवा दाखवला जातो, असे चित्रपट दाखवले जात असल्याचा आरोपही या आंदोलकाने केला. भगवा हा तपस्येचा आणि तपोभूमीचा महिमा आहे. तो तिरंग्याच्या कपाळावर लावला जातो,. भागलपूरसारख्या शहरात हा चित्रपट चालवणे केवळ अशक्य असल्याचेही या आंदोलकांनी यावेळी सांगितले.