मंडी (हिमाचल प्रदेश) :टोमॅटोच्या दराने देशभरात जेवणाची चव बिघडवली आहे. सलादची प्लेट सोडा, अनेकांना तर फोडणीत देखील टोमॅटो वापरणे अवघड झाले आहे. 150 ते 250 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोची दहशत अशी आहे की, जगप्रसिद्ध मॅकडोनाल्डच्या बर्गरमधूनही टोमॅटो गायब झाले आहेत! किमतीचा विचार केला तर टोमॅटोपुढे सफरचंदही पाणी भरत असेल. सध्या रेस्टॉरंटपासून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातूनही टोमॅटो गायब झाले आहेत. मात्र यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोला बाजारात एवढा चांगला भाव मिळत असल्याने टोमॅटो शेतकऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे.
जयराम सैनी यांनी 8300 क्रेट टोमॅटो 1.10 कोटी रुपयांना विकले. 5 दशकांपासून टोमॅटोची लागवड : अशा या टोमॅटोने हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातील शेतकरी जयरामला करोडपती बनवले आहे. ६७ वर्षीय जयराम सैनी यांच्या म्हणण्यानुसार, ते गेली जवळपास ५ दशके टोमॅटोची लागवड करत आहेत. मात्र यावेळी त्यांना बाजारात मिळालेला टोमॅटोचा भाव आत्तापर्यंत कधीच मिळाला नाही. आश्चर्याचे म्हणजे मंडी जिल्ह्यातील धाबन गावातील जयराम सैनी टोमॅटो विकून करोडपती झाले आहेत.
जयराम सैनी यांची मुलेही शेतीत मदत करतात 8300 क्रेट विकून 1.10 कोटी कमावले : जयराम सैनी यांनी या हंगामात आतापर्यंत टोमॅटोचे 8300 बॉक्स विकले आहेत. त्यातून त्यांना 1 कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जयराम यांची दोन मुले सतीश आणि मनीष देखील त्यांच्या वडिलांना शेतीत मदत करतात. मोठा मुलगा सतीश हा सरकारी शिक्षक असून तो वडिलांना मदत करतो. धाकटा मुलगा सतीश हा वडिलांसोबत शेतीची कामे करतो. सतीशच्या म्हणण्यानुसार, तो त्याचे टोमॅटो थेट दिल्लीच्या आझादपूर मंडीत पाठवतो. तेथे त्यांच्या टोमॅटोला चांगला भाव मिळाला आहे.
..तर आणखी मालामाल झाल असते : जयराम यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांनी 60 बिघे जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. त्यांनी 1.5 किलो बियाणे पेरले होते. आतापर्यंत 8300 क्रेट टोमॅटोची विक्री झाली असून 500 क्रेट बाजारात जाण्यासाठी तयार आहेत. जयराम सांगतात की, जर त्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसता आणि काही पिकांना हवामानाचा फटका बसला नसता तर त्यांनी आतापर्यंत 12,000 क्रेट टोमॅटो विकले असते. हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पावसामुळे बाजारपेठेत पाठवलेले पीक वेळेवर पोहोचू शकले नाही, ज्याचे शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे.
जयराम यांच्या तरुणांना टिप्स : जयराम टोमॅटोशिवाय इतर भाज्याही पिकवतात. त्यांना शेतीचा प्रदीर्घ अनुभव आहे. जवळपास 50 वर्षांपासून शेती करणाऱ्या जयराम यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची चांगली माहिती आहे. जयराम शेतकऱ्यांना सांगतात की, शेतात सोनं उगवता येते, फक्त मेहनतीसोबतच शेतीशी संबंधित सर्व ज्ञान घेत राहा आणि स्वत:ला अपडेट ठेवा. त्याचप्रमाणे ते तरुणांना नोकरी न करता शेती करण्यास प्रवृत्त करतात.
एवढ्या पैशांचे जयराम काय करणार? : टोमॅटोची शेती करून करोडपती झालेल्या जयराम यांची परिसरात चर्चा होत आहे. जयराम यांनी टोमॅटो विकून 1 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ट्रॅक्टर जुना झाल्याने या पैशातून ते नवीन ट्रॅक्टर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय त्यांना शेतीत वापरण्यात येणारी उपकरणेही देखील अपग्रेड करायची आहेत.
हेही वाचा :
- Tomato Farming Pune : टोमॅटोने शेतकऱ्याला बनवले करोडपती!
- Tomato Tula : अजब टोमॅटोची गजब कहानी!...आता मंदिरात एका भाविकाने केली चक्क 'टोमॅटोतुला'
- Rich By Selling Tomatoes : हा शेतकरी टोमॅटो विकून झाला मालामाल!..दिवसाचे कमावतो लाखो रुपये