नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे. याची जाणीव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झाली आहे. सत्ता जाण्याच्या भीतीमुळे त्या भयभीत झाल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले.
टीएमसी आणि ममता बॅनर्जी हिंसाचाराचा अवलंब करत आहे. पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. तसेच काहींचा मृत्यू झाला. बंगालची जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. या वेळी बदल निश्चित आहे. ममता बॅनर्जी यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, असे गिरिराज सिंह म्हणाले.
येत्या 23 फेब्रुवारीला गिरिराज सिंह पश्चिम बंगालाचा दौरा करणार आहेत. येत्या 30 मे ला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विधानसभा कार्यकाळ संपणार आहे. पश्चिम बंगालमध्ये यंदा 294 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पाच राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपणार आहे.
पश्चिम बंगाल निवडणूक -
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.