हुन्नुर गावातील हेमाडपंती विठ्ठल मंदिर बेळगाव: यंदा पाऊस लांबल्याने अनेक धरणे, नदी, तलाव यांनी तळ गाठला आहे. यामुळे धरण बांधताना पाण्याखाली गेलेले गाव, मंदिर हे आता वर येऊ लागले आहेत. असेच एक बेळगाव जिल्ह्यामधील गाव, धरण बांधताना 46 वर्षांपूर्वी पाण्याखाली गेले होते. मात्र धरणातील पाणी कमी झाल्याने या गावातील मंदिर आता दिसू लागले आहेत. या मंदिरातील असलेली विठ्ठलाची मूर्ती ही 95 वर्षांपूर्वीची आहे. तर मंदिर एक वर्ष पाण्यात राहून देखील मातीचे मूर्ती स्वरूप वारूळ जसेच्या तसे आहे. यामुळे हे मंदिर बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
कुठे आहे मंदिर: बेळगावपासून चाळीस तर संकेश्वरपासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुन्नूर या गावात हे मंदिर आहे. महाराष्ट्रातून जायचे असेल तर पुणे-बंगळुरू महामार्गावरून जावे लागते. हे मंदिर हिडकल धरणात पाण्याखाली गेलेल्या हुन्नुर गावातील आहे. हेमाडपंथी विठ्ठल मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल ४६ वर्षानंतरही सुस्थितीत आहे. 51 टीएमसी क्षमतेचे हे धरण असून, यंदाचा मान्सून लांबल्याने धरणातील पाण्याने यावर्षी तळ गाठला आहे. धरण बांधण्याच्या अगोदर असलेले हे मंदिर तब्बल चार दशकानंतर पहिल्यांदाच पाण्याबाहेर आले आहे.
काय आहे मंदिराचा इतिहास : हुन्नूर हे सध्या विस्थापित झालेले गाव असून, १९७७ पूर्वी हे गाव या धरण क्षेत्रात होते. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी १९७३ मध्ये येथे धरण बांधायाचे ठरले होते. यामुळे हे गाव धरण क्षेत्रातून दुसऱ्या स्थळी विस्थापित करण्यात आले. १९७७ मध्ये जलाशयाचे काम पूर्ण झाले. मात्र अनेक वर्षांपासून हे गाव धरण क्षेत्रात असल्याने १९२८ मध्ये केवळ ८ हजारात येथील शिंगाडी पुजारी, बाळाप्पा गडकरी, गुरूनाथ कुलकर्णी यांच्या पुढाकाराने येथे मंदिर बांधण्यात आले होते. यामुळे हुन्नूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर पाण्याखाली गेले.
अशी मंदिराची आख्यायिका : निवडुंगाच्या झुडपातील वारूळात विठ्ठलचा वास होता. त्याठिकाणी येताच पाटलाच्या गाईला आपोआप पान्हा फुटायचा, असे सांगण्यात येते. गावातील एका माणसाच्या स्वप्नात येवून देवाने सांगितले की, ‘मी विठ्ठल आहे, माझी पूजा करा’. त्यामुळे गावकऱ्यांनी वारूळाची पूजा करून त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर ३० बाय ३० आकाराचे काळ्या पाषाणात स्थानिक कारागिरांनी चुनखडीत बांधले. मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत, तसेच सुमारे ४० फूट उंचीचे छत आहे तर शिखरही दगडी आहे.
मंदिरातील वारूळा विषयी : या मंदिराच्या आवारातच घोड्याचा तबेला, शाळा आणि स्वयंपाकाची खोली होती, ती पाण्यामुळे पडली. तर मंदिराचे भव्य दगडी प्रवेशद्वार अन् सनई, चौघड्याची दुमजली खोली अद्याप सुस्थितीत आहे. हे मंदिरात विठ्ठलाचे असले तरी येथे विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती नसून वारूळ आहे. वर्षानुवर्षाच्या ‘चंद्र’ लेपणामुळे या वारूळावर शेंदूरसदृश्य थर तयार झाला. मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर तब्बल ४६ वर्षानंतरही हे वारूळ विरघळलेले नाही. त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही. मंदिराच्या आजूबाजूला बसवाण्णा, लक्ष्मी, दुर्गामाता यांचे मंदिरे असून, यापैकी बसवाण्णा मंदिर पाण्यातच आहे.
अशी आहे गावची सद्य परिस्थिती : विठ्ठल गावाचा ग्रामदैवत असल्याने १९७३ मध्ये गाव विस्थापित झाल्यानंतर शासनाने सिमेंटमध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. मात्र ते जुन्या मंदिरासारखे दिसत नसल्याने ते पाडण्यात आले. कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुन्हा जुन्या मंदिराची प्रतिकृती असणारे भव्य मंदिर गावात बांधले. या गावात जवळपास ३०० कुटुंब राहतात. यातील अडीचशे कुटुंबे धनगर समाजाची आहेत. त्यांच्याकडेच या मंदिराची पूजा आहे. उर्वरित लिंगायत, ब्राम्हण, बेडर, मुस्लिम, हरिजन कुटुंबे मंदिराचे हक्कदार आहेत.
हेही वाचा -
- Jagannath Rath Yatra 2023: मिरवणुकीसाठी आज पुरीत जमला लाखोंचा जनसमुदाय; चार वाजता भाविक रथ ओढणार
- Ambabai Temple : भक्तांकडून अंबाबाईच्या चरणी 'इतक्या' लाखांचे दान