नवी दिल्ली :उत्तर भारतात पावसाने केलेल्या हाहाकाराने तब्बल 37 नागरिकांना आपला जीव गमवाव लागला आहे. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पावसाने हाहाकार केल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीबद्दल बोलून त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत देशाच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
या राज्यात गेले नागरिकांचे बळी :उत्तरेकडील राज्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशात 18, पंजाब आणि हरियाणामध्ये 9, राजस्थानमध्ये 7 आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसात 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील यमुना नदीसह उत्तर भारतातील अनेक नद्यांना उधाण आले आहे. परिसरातील अनेक रस्ते व वस्त्यात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी वाहने पुरात वाहून गेल्याने नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले. रविवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे महापालिका यंत्रणाही परिस्थिती सुधारण्यात हतबल दिसून आली.
बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात : उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये एनडीआरएफच्या 14 तुकड्या कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेशात तब्बल 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये 8 आणि हरियाणामध्ये 5 तुकड्या तैनात आहेत. मुसळधार पावसाच्या हाहाकारामुळे राज्य प्राधिकरणांच्या समन्वयाने बचाव कार्य केले जात असल्याची माहिती एनडीआरएफच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आल्याने लष्कराने एका खासगी विद्यापीठातील 910 विद्यार्थी आणि इतर 50 जणांची सुटका केली.
शिमल्यात आणखी चार जणांचा मृत्यू :जोरदार अतिवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशातील अनेक भागात भूस्खलन झाले. या भूस्खलनात शिमल्यात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. पहाडी परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी शिमला-कालका महामार्ग ठप्प झाला. राज्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. गेल्या 50 वर्षांत राज्याने असा मुसळधार पाऊस पाहिला नाही. चंद्रताल आणि लाहौल आणि स्पितीमधील पागल आणि तेलगी नाल्यांमध्ये अडकलेल्या 400 पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.