चंदीगड : चंदीगडमध्ये पावसाने गेल्या 23 वर्षांचा विक्रम मोडला आहे. चंदीगड हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये गेल्या 30 तासांत तब्बल 322.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 18 जुलै 2000 रोजी शहरात 262 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या 30 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चंदीगडमधील रस्त्यांवर पाणी साचले आहे. चंदीगड पोलिसांनी शहरातील अनेक मार्ग बंद केले आहेत.
5 दिवस पाऊस असाच सुरु राहील : चंदीगड हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 5 दिवसांत पाऊस असाच सुरू राहील. 9 जुलै म्हणजेच रविवारी दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 10 जुलै रोजीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणाबद्दल बोलायचे झाले तर, हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, यमुनानगर जिल्ह्यातील रादौरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात येथे 246 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कुठे किती पाऊस झाला? : कालकामध्ये 244 आणि पंचकुलामध्ये 239 मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय अंबाला येथे 224 मिमी तर बरवाला येथे 220 मिमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे, कुरुक्षेत्रात गेल्या 24 तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हरियाणातील फतेहाबाद येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. येथे सुमारे 47 मिमी पाऊस झाला आहे. यासह, हरियाणाचे कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. त्याच वेळी, अंबाला येथे सर्वात कमी 18.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.