मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत पावसाचं थैमान चेन्नईMichaung Cyclone : 'मिचॉन्ग' या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल आणि रहिवासी भागात पाणी साचलं आहे. यामुळे जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झालं. याशिवाय वाहतूक कोंडीही झाली होती. हे वादळ ५ डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
७० उड्डाणं रद्द : शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक भागात वीज गेली. याशिवाय इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. संततधार पावसामुळे चेन्नई विमानतळाचं कामकाज सकाळी ९:४० ते ११:४० या वेळेत बंद ठेवण्यात आलं होतं. विमानतळावर येणारी आणि जाणारी सुमारे ७० उड्डाणं रद्द करण्यात आली होती. धावपट्टी आणि रस्ते मार्गही बंद आहेत. 'मिचॉन्ग' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्रीपासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
आंध्र प्रदेशला धडक देणार : भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, चक्रीवादळ ३ डिसेंबर रोजी रात्री बंगालच्या उपसागरात चेन्नई आणि पुडुचेरीच्या पूर्वेस होतं. ते उत्तरेला वाटचाल करत असून, ५ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टनमच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे अनेक रेल्वे आणि हवाई सेवा रद्द झाल्या आहेत किंवा उशीरानं धावत आहेत.
रेल्वे सेवांना फटका : दक्षिण रेल्वेनं चेन्नई सेंट्रल येथून निघणाऱ्या सहा गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे सेवांना फटका बसला. याशिवाय, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, दुबई आणि श्रीलंका यासह असंख्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा वळवल्या गेली आहेत. दरम्यान, तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी बाधित भागातील पावसाच्या पाण्याच्या निचरा कामांची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा :
- मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये चकमक; तब्बल 13 ठार
- उत्तर प्रदेशात धुक्याचं साम्राज्य; विमान उड्डाणास अडथळा, अनेक विमानं रद्द तर काही विमान उड्डाणाला उशीर