नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज ईशान्य भारत आणि सिक्कीम आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून या राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागांवर मान्सूनचा प्रभाव : पुढील चार दिवसात दक्षिण उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागांवर मान्सूनचा जोरदार प्रभाव दिसून येणार आहे. त्यासह काश्मीर आणि लडाखमध्ये मान्सून सक्रिय राहणार आहे. त्यामुळे येथे मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर मान्सून अधिक सक्रिय आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टी होऊ शकते. 16 जुलैच्या आसपास वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
- उत्तर पश्चिम भारत :आज वायव्य भारतातील उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून या भागात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 13 जुलै ते 16 जुलैपर्यंत पूर्व राजस्थान आणि 15 आणि 16 जुलैला हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व आणि ईशान्य भारत : पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, झारखंड आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडच्या विविध भागात 14 आणि 15 जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता : पुढील चार दिवसात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पश्चिम मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
- पश्चिम भारत :कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवसात सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि गुजरात प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- दक्षिण भारत :भारतीय हवामान विभागाने 13 आणि 14 जुलैला वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय कर्नाटकच्या किनारी परिसरात, दक्षिण कर्नाटक आणि केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रॉयलसीमा येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.