आग्रा Krishna Janmabhoomi Case :बहुचर्चित आग्रा जामा मशीद खटल्याची सुनावणी आज (19 डिसेंबर) येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात होणार आहे. मशिदीच्या पायऱ्यांखाली भगवान कृष्णाची मूर्ती पुरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख 19 डिसेंबर दिली होती. श्री कृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे वकील विनोद शुक्ला म्हणाले की, "विरोधी पक्षांनी न्यायालयात खटला पुढं ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळं हाय कोर्टानं लोअर कोर्टला 6 महिन्यांत खटला निकाली लावण्याचे निर्देश दिले आहेत".
दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात आग्रा जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीबाबत खटला सुरू आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टनं ASI तांत्रिक तज्ञांच्या पथकानं जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याची मागणी करत न्यायालयात दावा दाखल केला आहे. तर, एका प्रतिवादीनं न्यायालयात अर्ज दाखल केला असून, जामा मशिदीच्या प्रकरणाची सुनावणी करण्याचे अधिकार न्यायालयाला नाहीत, असं आव्हान दिलंय.
कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी केला दावा :श्री कृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी दावा केला आहे की, मुघल शासक औरंगजेबानं मथुरा कृष्ण जन्मभूमितील भगवान केशवदेवांची मूर्ती आग्र्याच्या जामा मशिदीच्या (जहांआरा बेगम मस्जिद) पायऱ्यांखाली 1670 मध्ये पुरली होती. त्यामुळं न्यायालयानं आधी जामा मशिदीच्या पायऱ्यांवरुन लोकांची ये-जा थांबवावी. यासोबतच एएसआयनं जामा मशिदीच्या पायऱ्यांचं सर्वेक्षण करुन तिथून श्रीकृष्णाच्या मूर्ती हटवाव्यात. यासंदर्भात देवकीनंदन ठाकूर यांनी आग्रा इथं सनातन जागृती संमेलन आयोजित केलं होतं. यामध्ये त्यांनी सनातनी संघटनांना संघटीत करण्यासोबतच आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही केलं. तसंच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले होते.
एएसआयच्या सर्वेक्षणातून सत्य समोर येईल :श्री कृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे वकील विनोद शुक्ला म्हणाले की, जामा मशिदीचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी एएसआय सर्वेक्षण करण्यात यावं, अशी आम्ही न्यायालयाकडं यापूर्वीच मागणी केली आहे. एएसआयच्या पाहणी अहवालानं वाद संपुष्टात येऊ शकतो. सर्वेक्षण अहवालातून वास्तव समोर येईल. तर, प्रतिवादी पक्षानं जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करुन न्यायालयाला जामा मशीद प्रकरणाच्या सुनावणीचे अधिकार नसल्याचं आव्हान केलंय. त्यावरच आज सुनावणी होणार आहे.
शाहजहानच्या आवडत्या मुलीनं बांधली जामा मशीद :ज्येष्ठ इतिहासकार राजकिशोर 'राजे' म्हणतात की मुघल सम्राट शाहजहानला 14 मुले होती. ज्यामध्ये मेहरुन्निसा बेगम, जहाँआरा, दारा शिकोह, शाह शुजा, रोशनारा, औरंगजेब, उमेदबक्ष, सुरैया बानो बेगम, मुराद लुतफुल्ला, दौलत अफजा आणि गौहरा बेगम यांचा समावेश होता. तर एका मुलाचा आणि एका मुलीचा जन्मावेळी मृत्यू झाला. शाहजहानची आवडती मुलगी जहाँआरा यांनी 1643 ते 1648 या काळात जामा मशीद बांधली.
औरंगजेबानं मूर्ती आणि पुरातन वस्तू आणल्या :ज्येष्ठ इतिहासकार राजकिशोर 'राजे' यांनी म्हंटलंय की, 16 व्या शतकाच्या सातव्या दशकात मुघल सम्राट औरंगजेबानं मथुरेचं केशवदेव मंदिर पाडलं होतं. त्यांनी केशवदेव मंदिरातील मूर्तींसह सर्व पुरातन वस्तू आग्रा इथं आणल्या होत्या. त्यांनी जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुतळे आणि पुरातन वस्तू पुरल्या. अनेक इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकात हे नमूद केलंय. यामध्ये औरंगजेबाचे सहाय्यक असलेले मुहम्मद साकी मुस्तैद खान यांनी त्यांच्या 'मआसिर-ए-आलमगिरी' या पुस्तकात, प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या 'अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब' या पुस्तकात, माझ्या 'तवारीख़-ए-आगरा' या पुस्तकात आणि मथुराचे प्रसिद्ध साहित्यिक प्रो. चिंतामणी शुक्ल यांच्या 'मथुरा जिल्ह्याचा राजकीय इतिहास' या पुस्तकातही जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली मूर्ती पुरल्याबाबत तपशीलवार उल्लेख आहे.
हेही वाचा -
- Shri Krishna Janmabhoomi case: श्रीकृष्ण जन्मभूमी ईदगाह प्रकरण, वादग्रस्त जमिनीच्या सर्वेक्षणाचे न्यायालयाचे आदेश
- Woman Namaz In Jama Masjid : मुंबईतल्या जामा मशिदीत महिला करणार नमाज पठण; अध्यक्षांचा पुढाकार
- ज्ञानवापीनंतर आता बदाऊनच्या जामा मशिदीमध्ये नीलकंठ महादेव मंदिर असल्याचा दावा