मुंबई :भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) गेल्या वर्षी मंजूर केलेल्या शुल्काच्या आदेशाची घटनात्मक वैधता मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवारी) कायम ठेवली. मात्र, एका चॅनलची किंमत ही त्या चॅनल-सेटमधील सर्वात महागड्या चॅनलच्या एक तृतीयांशच असावी, त्यापेक्षा अधिक नाही असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने टीव्ही ब्रॉडकास्टर्सची प्रतिनिधी संस्था, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन; फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया, झी एंटरटेनमेंट लिमिटेड आणि सोनी यासारख्या अनेक प्रसारकांनी दाखल केलेल्या अनेक याचिकांवर हा निर्णय दिला.
1 जानेवारी, 2020 रोजी ट्रायने नवीन दर नियम जारी केले होते. ज्याद्वारे नेटवर्क कॅपेसिटी फी (एनसीएफ) किंमत कमी करण्यात आली होती. ज्याचा फायदा ग्राहकांना झाला आहे. पूर्वी, सर्व मोफत (फ्री-टू-एअर) चॅनल्ससाठी 130 रुपयांची रक्कम लागू होती, आणि अतिरिक्त चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागत होते. ब्रॉडकास्ट सेक्टरच्या दरांच्या दुरुस्तीनंतर ग्राहकांना एनसीएफ शुल्क म्हणून 130 रुपये द्यावे लागत आहेतच; मात्र यामध्ये त्यांना २०० चॅनल्स मिळत आहेत. स्वतंत्र वाहिन्यांच्या किंमतीतही बदल करण्यात आला आहे.