नवी दिल्ली :काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हरियाणातील महिला शेतकऱ्यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते. या दरम्यान एक रंजक घटना घडली. एका महिलेने सोनिया गांधी यांना राहुलचे लग्न करण्यास सांगितले. यावर सोनियाने त्यांच्यासमोरच मुलगी शोधण्याचा प्रस्ताव ठेवला. सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधताना हरियाणातील महिला शेतकरी म्हणाल्या, 'राहुलचे लग्न करून द्या'. यावर सोनियाने 'तुम्हीच त्याच्यासाठी मुलगी शोधा', असे उत्तर दिले.
राहुल गांधींना हाताने जेवण भरवले : राहुल गांधी यांनी नुकतेच हरियाणा दौऱ्यात महिला शेतकऱ्यांना मेजवानी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करत सोनिया गांधी यांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील काही महिलांना त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवणासाठी आलेल्या महिलांनी सोनिया गांधी यांच्याशी राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत चर्चा केली. राहुल तिथे उभे राहुन हे संभाषण ऐकत होते. यावर ते म्हणाले की, 'होईल...'. या दरम्यान एका महिलेने राहुल गांधींना हाताने जेवणही भरवले.
राहुल गांधींनी दिले होते आश्वासन : 8 जुलै रोजी राहुल गांधी अचानक सोनीपतच्या मदिना गावात पोहोचले होते. तेथे त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला होता. त्यावेळी राहुल गांधींनी शेतकऱ्यांना दिल्ली दर्शनासाठी बोलावण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी राहुल गांधींना सांगितले होते की, राष्ट्रीय राजधानीच्या इतके जवळ असूनही ते कधीच दिल्लीला गेलेले नाहीत. या दरम्यान शेतकरी महिलांनी प्रियंका गांधींशी देखील बातचीत केली होती. या महिलांनी प्रियंका गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला : महिलांना भेटल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'राहुल गांधींनी सोनीपतच्या शेतकरी भगिनींना दिल्लीला बोलावण्याचे आश्वासन दिले होते. शेतकरी भगिनी दिल्लीत आल्या आणि अशा प्रकारे वचनपूर्ती झाली'. व्हिडिओमध्ये गांधी कुटुंब महिलांशी संवाद साधताना आणि त्यांना जेवण देताना दिसत आहे. यामध्ये राहुल गांधी महिलांना जेवण आवडले की नाही आणि सगळ्यांनी मिठाई खाल्ली की नाही, असे विचारताना दिसले.
हेही वाचा :
- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..
- Rahul Gandhi reached Karol Bagh: राहुल गांधींनी गॅरेजमध्ये जात दुचाकीची केली दुरुस्ती अन् मॅकेनिकशी मैत्री