चंडीगढ : नूह येथे झालेल्या हिंसाचारानंतर (Nuh Violence) हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. फरिदाबाद आणि पलवल जिल्ह्यांमध्ये आणि गुरुग्रामच्या तीन उपविभागांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने आदेश (Nuh Violence Internet Ban) जारी करत या भागांमध्ये 5 ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.
इंटरनेट सेवा बंद: हरियाणाच्या गृहसचिवांनी नूह, फरिदाबाद, पलवल आणि गुरुग्रामच्या उपायुक्तांसह संबंधित जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर आणि तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे गृहसचिवांनी म्हटले आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचा आदेश जारी करताना गृह सचिवांनी म्हटले आहे की, मोबाईल फोन आणि एसएमएसवर व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोणीही चुकीची माहिती आणि अफवा पसरू नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे आंदोलक पुन्हा संघटित होऊन मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे सरकारने हिंसाचारग्रस्त भागात 5 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.