नूह (हरियाणा) : हरियाणातील नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) ब्रज मंडल यात्रेनंतर हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या संघर्षाच्या निषेधार्थ आज हिंदू संघटनांनी मानेसरमध्ये पंचायत बोलावली आहे. यासोबतच विहिंपने पानिपतमध्येही बंदची हाक दिली आहे.
कलम 144 लागू : हरियाणातील नूह, पलवल, फरिदाबाद, रेवाडी, गुरुग्राम, महेंद्रगड, सोनीपत आणि पानिपत या 8 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मंगळवारी गुरुग्राम वगळता बहुतांश भागात परिस्थिती सामान्य होती. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 2 होमगार्ड जवान आणि 4 नागरिकांचा समावेश आहे. हिंसाचारात जखमी झालेल्यांना नल्हार आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राकडून हरियाणा पोलिसांच्या 30 तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या हिंसाचारग्रस्त भागात पाठवल्या जाणार आहेत. यापैकी 14 युनिट नूह, 3 पलवल, 2 फरिदाबाद आणि एक गुरुग्रामला पाठवण्यात आली आहे.