चंदीगढ :निकिता तोमर हत्याकांड प्रकरणी आज निकाल जाहीर झाला. जलदगती न्यायालयाचे न्याायधीश सरताज बासवाना यांनी दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली आहे. २४ मार्चला या प्रकरणाचा निकाल जाहीर करत, शिक्षेची सुनवणी राखीव ठेवण्यात आली होती. यामध्ये आरोपी तौसिफ आणि त्याचा मित्र रेहान यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. तर, तिसरा आरोपी अझरुद्दीनची निर्देोष मुक्तता करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
२६ ऑक्टोबरला निकिता परीक्षेनंतर आपल्या घरी जात होती. यावेळी तौसिफ आणि त्याचा मित्र एका गाडीमधून तिथे आले. यावेळी त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध दर्शवत झटापट केल्यानंतर तौसिफने तिला गोळी मारली, आणि तिथून पळून गेला. यातच तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, ज्यावरुन आरोपींची ओळख पटली आणि पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी या दोघांना अटक केली होती.
हे प्रकरण देशभरात गाजले होते. यानंतर हरियाणाच्या विधानसभेत लव्ह जिहाद कायदा लागू करण्यावरुन बराच गदारोळही झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ७०० पानांची चार्जशीट दाखल केली होती. तसेच, ११ दिवसांमध्ये हे प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. निकिताचे पालक याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होते.
हेही वाचा :बिहारमध्ये दोन चिमुरड्यांचे अपहरण करुन हत्या; सावत्र भावांवर संशय