करनाल -हरियाणाच्या कर्नाल येथील 6 वर्षांची चिमुकली आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा ध्वज फडकावणार आहे. 26 जानेवारीला ही चिमुकली किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर तिरंगा फडकणार असल्याने ही अभिमानाची बाब आहे. कर्नालच्या या लेकीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार वेळा आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा आपले नाव नोंदवले आहे. सिएना चोप्रा असे कर्नालच्या चिमुकलीचे नाव आहे.
गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा विक्रम करणार प्रस्थापित :सिएना ही चिमुकली कर्नालच्या उंद्रीजवळील गोरगढ या गावची आहे. ती आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजरो सर करुन गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. २६ जानेवारीला आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजरो या १९ हजार ३४१ फूट उंचीच्या शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकावण्याचे सिएनाचे ध्येय आहे.
महिला सक्षमीकरणाचे उदाहरण :सिएना ही चिमुकली मिशन किलीमांजारोमध्ये महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण सादर करणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. तिचे वडील प्रदीप चोप्रा म्हणाले की, यापूर्वी सिएनाने चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. तसेच तिने तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही विक्रम केला आहे. सिएना सध्या लुधियानातील एका खासगी शाळेत शिकत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. खरे तर सिएनाची ही मोहीम आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे या मोहिमेचे प्रायोजक गौरव यांनी यावेळी सांगितले.