नवी दिल्ली : सरकारने या वर्षीपासून 'कॅशलेस हज'वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हज यात्रेकरूंना परकीय चलन वापरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. पूर्वीच्या प्रणालीनुसार, हज यात्रेकरूंना 2100 सौदी रियाल (सुमारे 45 हजार रुपये) भारतीय हज समितीकडे जमा करायचे होते, जे त्यांना सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदिना येथे खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
कॅशलेस हज : मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, 'आता हज यात्रेकरूंना ही रक्कम हज समितीकडे जमा करण्याची गरज भासणार नाही. ते थेट एसबीआयद्वारे हे पैसे मिळवू शकतात. त्यांना 'फॉरेक्स कार्ड'ही दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना आता सोबत रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. आता ते त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करू शकतात. ते म्हणाले, 'डिजिटल इंडियामध्ये 'कॅशलेस हज'वर भर दिला जात आहे. यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा खर्चही कमी व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे.