भोपाळ : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये कोरोना लसीकरणामध्ये गोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी कोरोना लसीकरणासाठी एकाच फोन नंबरने तब्बल ९४० जणांच्या नावाची नोंदणी करण्यात आली होती. या ९४० अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकालाही अद्याप लस मिळाली नाही. त्यामुळे प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लसीकरणाचा वेग कमी..
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या सर्वांना लसीकरणासाठी नाव नोंदवणे गरजेचे आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना लस टोचण्याचे लक्ष्य ठेऊन असताना, प्रशासनाचा अशा हलगर्जीपणामुळे यात अडथळे येताना दिसून येत आहे.