आरोग्य विभागाच्या पथकाने वाचवले गुरुग्राम (हरियाणा): गुरुग्रामच्या मारुती विहार कॉलनीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने स्वत:ला आणि तिच्या 11 वर्षाच्या मुलाला 3 वर्षे घरात कैद करून ठेवले होते. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांची सुटका केली. कोरोनाच्या भीतीने आईने स्वत:ला आणि 11 वर्षाच्या मुलाला घरात कैद करून ठेवले होते. कोरोनाच्या भीतीने मुनमुन नावाची महिला ना स्वतः घरातून बाहेर पडत ना आपल्या मुलाला येऊ देत. 11 वर्षीय मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
पती द्यायचा जेवण, राहायलाही बाहेर: त्यानंतर पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांची सुटका केली. चौकशीत असे आढळून आले की, महिलेचा पती या दोघांना घरी जेवण पुरवत असे. तो स्वतः दुसऱ्या घरात भाड्याने राहत होता. आता महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. तो म्हणतो की, बऱ्याच दिवसांपासून तो आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्या पत्नीला हे समजत नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने ती स्वतः घरातून बाहेर पडत नाही आणि आपल्या मुलालाही बाहेर पडू देत नाही. गुरुग्रामच्या सीएमओने सांगितले की, महिलेने तिच्या पतीला घरात येऊ दिले नाही.
शेजाऱ्यांनाही माहिती नव्हती :शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब गेल्या 8 वर्षांपासून येथे राहत असून, त्यांच्याविरुद्ध कोणाचीही तक्रार नव्हती. हे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांपासून शेजाऱ्यांनाही भेटले नव्हते. त्यामुळे कोरोनाच्या काळात हे कुटुंब आपल्या गावी गेल्याचे शेजाऱ्यांना वाटले. कोरोनाच्या आधी मुल शाळेत जायचे, पण कोरोनाच्या कालावधीनंतर मूल सुद्धा दिसत नव्हते, त्यामुळे शेजाऱ्यांना वाटले की ते मूलही आजी-आजोबांच्या घरी गेले आहे. मात्र पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने आई-मुलाची सुटका केल्यावर शेजारीही आश्चर्यचकित झाले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेशी बोलणे व्हायचे, पण बहुतेक ती आपल्या मुलाच्या प्रकृतीबद्दल सांगायची.
काय म्हणतात डॉक्टर?: सीएमओ डॉ वीरेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून दोघांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. जिथे मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये डॉक्टरांना असे आढळून आले की, मुलावर तज्ञांच्या देखरेखीखाली चांगले उपचार करणे आवश्यक आहे, त्यानंतर मुलाला पीजीआय रोहतक येथे पाठवण्यात आले आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टर वीरेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार महिला आणि मुलाची स्थिती कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देण्याची आहे. मात्र मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनुसार महिलेने तिच्या पतीलाही मुलाला भेटू दिले नाही. त्यामुळे नवराही वेगळे राहत असे आणि दोघांची खाण्यापिण्यासह इतर व्यवस्था बाहेरून करत असे.
हेही वाचा: Rebrand Rahul Gandhi: काँग्रेसचा मोठा 'प्लॅन'.. राहुल गांधींचे विदेशातही करणार 'ब्रॅण्डिंग', लवकरच युरोपात कार्यक्रम