भोपाळ Guna BusAccident : डंपरसोबत समोरासमोर झालेल्या अपघातानंतर पेटलेल्या प्रवासी बसच्या भीषण आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत 14 प्रवाशी होरपळल्यानं गंभीर झाले आहेत. ही घटना गुनावरुन आरोनला जाताना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अपघातात मृत झालेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
डंपरच्या धडकेनंतर पेटली बस डंपर आणि प्रवासी बसची समोरासमोर धडक :गुना इथून आरोनकडं जाणारी प्रवासी बस 30 प्रवाशांना घेऊन रात्री 9 वाजताच्या दरम्यान निघाली होती. तर डंपर गुनाच्या दिशेनं जात होता. यावेळी प्रवासी बस आणि डंपरची समोरासमोर धडक झाल्याची माहिती गुनाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघात होताच बसनं पेट घेतला. बसमधील प्रवाशांना काही समजण्याच्या आतचं संपूर्ण बस पेटली. त्यामुळं चार जणांनी कसंतरी बसच्या बाहेर येत जीव वाचवला, मात्र यात ते गंभीर जखमी झाले. बसमधील तब्बल 12 प्रवाशांचा या आगीत बळी गेल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक यावेळी म्हणाले. या घटनेत 14 प्रवाशी गंभीर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा :गुना इथल्या अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. यासोबतचं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. याबाबत बोलताना गुनाचे जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी "अपघाताचे कारण शोधण्यासाठी प्रशासन घटनेची चौकशी करत आहे. त्यामुळं लवकरच या अपघाताचं कारण समोर येईल", असं स्पष्ट केलं.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला शोक :गुना अपघातात तब्बल 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शोक व्यक्त केला. हा अपघात अत्यंत वेदनादायक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "गुना आरोन रोडवरील प्रवासी बसला आग लागल्याचं वृत्त आताचं कळालं. ही घटना अत्यंत दुःखद आहे. याबाबत गुना जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, अशी मी प्रार्थना करतो" असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- MP Accident : भरधाव जाणारा ट्रक बोलेरोवर जीपवर पलटला, 7 जणांचा जागीच मृत्यू
- MP Accident : सीधी येथील अपघातात 14 ठार, 50 हून अधिक जखमी ; मुख्यमंत्र्यांनी केली नुकसानभरपाई आणि नोकरीची घोषणा
- MP Accident Death : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मध्य प्रदेशात मिनी ट्रक नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू