गांधीनगर : तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातला मोठा तडाखा बसला आहे. राज्याच्या किनारपट्टीसह सौराष्ट्र भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यात या वादळामुळे १३ जणांचा जीव गेला असून; घरे, झाडे, वीजेचे खांब यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरात आणि दीव दौऱ्यावर असणार आहेत.
बचाव पथकांकडून पुनर्वसन सुरू..
राज्यातील सुमारे ९६ तालुक्यांमध्ये चार इंचाहून अधिक पाऊस झाला. सहा तालुक्यांमध्ये आठ ते नऊ इंच पावसाची नोंद झाली. तर, दक्षिण गुजरातमध्ये तब्बल १४ इंच पावसाची नोंद करण्यात आली. सुमारे ५९ हजार ४२९ वीजेचे खांब कोसळले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सध्या राज्यात ९१५ पथके बचावकार्य करत आहेत. राज्य सरकारचे मुख्य लक्ष्य कोरोना रुग्णांच्या उपचारात अडथळा येऊ देऊ नये हे होते. राज्यातील १,४०० रुग्णालयांपैकी १६ रुग्णालयांमध्ये वीज जाण्याचा प्रकार घडला. यातील १२ रुग्णालयांमध्ये तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, तर बाकी रुग्णालयांमध्ये जनरेटरवर कामकाज सुरू राहिले. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबत माहिती दिली.
कित्येक गावांमधील वीजपुरवठा खंडित..
राज्यातील भावनगर येथील ऑक्सिजन प्लांटलाही वादळाचा फटका बसला. याठिकाणी काही काळासाठी ऑक्सिजनची निर्मिती थांबली होती. मात्र, यापूर्वीच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा करुन ठेवण्यात आला होता. तसेच, राज्यातील ६७४ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यांपैकी ५६२ रस्त्यांवरील वाहतूक काही काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. सुमारे २,४३७ गावांमधील वीजपुरवठा स्थगित झाला होता. यातील ४८४ गावांमधील वीजपुरवठा मंगळवारी रात्रीपर्यंत सुरळीत करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा..
या वादळाचा तीळ, बाजरी आणि मुगाच्या पिकाला मोठा फटका बसला. तसेच, आंबा आणि नारळाच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले. सोमनाथ जिल्ह्यातील उना आणि गीर या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले. कित्येक रस्ते या वादळामुळे वाहून गेले. वादळामुळे ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांन मदत जाहीर केली आहे.
या वादळामुळे राज्य सरकारने सुमारे दोन लाख लोकांचे स्थलांतर केले. राज्यातील कोरोना लसीकरणही थांबवण्यात आले असून, २० मे नंतर ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा :खास मुलाखत; केंद्रच नव्हे तर सर्वच राज्यांकडून कोरोना काळात जनता निराश-कुमार विश्वास