अहमदाबाद - किडनी स्टोनमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी किडनीच काढून घेतल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणावर कडक कारवाई करत गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने हॉस्पिटलला 11 लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे. ही रक्कम मृताच्या वारसांना दिली जाईल.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यात असलेल्या वांघरोळी गावातील रहिवाशी देवेंद्रभाई रावल यांना पाठदुखीचा आणि लघवी करताना त्रास होत होता. मे 2011 मध्ये त्यांना हा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रावल यांनी केएमजी जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर शिवूभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मे 2011 मध्ये, त्याच्या डाव्या मूत्रपिंडात 15 मिमी स्टोन असल्याचे उघड झाले. रावल यांना चांगल्या उपचारासाठी चांगल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु त्यांनी त्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे योग्य मानले.