अहमदाबाद - पती मृत्यू शय्येवर अखेरच्या घटका मोजत असून पत्नीला आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या आधारे मुल हवे आहे. ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. पत्नीच्या या मागणीला गुजरात उच्च न्यायालयानेही संमती दिली असून रुग्णालयाला तसे निर्देश दिले आहेत.
संबंधित महिलेचे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात लग्न झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र, अचानक त्याच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. कोरोनाच्या महामारीत महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे त्याची तब्येत खालावत गेली. त्याला बरे करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, अवयव निकामी झाल्याने अखेर डॉक्टरांनीही माघार घेतली.
पती आणखी काही दिवसांचा सोबती असल्याचे कळताच पत्नीने डॉक्टारांकडे आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या आधारे मुल हवे असल्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, डॉक्टरांनी नकार दिला. न्यायालयाची संमती असल्याशीवाय आम्ही स्पर्म काउंट करू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघांच्या प्रेमाची निशानी हवी म्हणून महिलेने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही महिलेच्या याचिकेला मान्यता दिली असून रुग्णालयाला तसे निर्देश दिले आहेत.