अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील बहुमजली रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची समजताच रुग्णालयातील सुमारे 100 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याविषयीची माहिती साहिबाग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली. प्राथमिक माहितीनुसार, शहरातील साहिबाग परिसरात असलेल्या राजस्थान हॉस्पिटलच्या तळघरात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.पोलीस निरीक्षक एमडी चंपावत यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरातून धूर निघत आहे. रुग्णालय बहुमजली असून जवळपास 100 रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान हॉस्पीटलला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हे रुग्णालय एका चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविले जाते. आगीच्या दुर्घटनेने लगतच्या परिसरात घबराट पसरली आहे. आग पसरू नये म्हणून रहिवाशांनी सतर्कता बाळगून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.