अहमदाबाद - गुजरात पोलिसांनी ड्रग्जविरोधी (gujarat drug case )मोठी कारवाई केली आहे. देवभूमी द्वारका आणि सुरत येथून 66 किलो अंदाजे 350 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. 16 किलो हेरॉईन आणि 50 किलो एमडी ड्रग्ज आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये आणले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. एटीएस, एलसीबी आणि एसओजीच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
समुद्रमार्गे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे देवभूमी द्वारका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली. एका आरोपीला वडिनारजवळ 14 ते 15 किलो ड्रग्जसह पकडण्यात आले. त्याचे बाजारमूल्य अंदाजे 70 कोटी रुपये आहे.
सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडून सर्वाधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सज्जाद असे असून तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. सज्जाद हा ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भाजी विक्रेता आहे. त्याच्याकडून बॅगमधून 19 पॅकेट्स जप्त करण्यात आली आहे. तक्यामध्ये 11.483 किलोग्रॅम हेरॉईन आणि 6.168 किलोग्रॅम मेथामेफटामाइन आढळून आले आहे. तर इतर दोघांकडून 17.65 किलोग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सलीम याकुब करा आणि अली याकुब करा या जामनगरमध्ये राहणाऱ्या दोघांनी त्याला ड्रग्ज दिले. पोलिसांनी त्यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर आणखी 47 पाकिटं सापडली.