सूरत : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरच्या समुद्र किनारी मोठी कारवाई चार परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे चारही संशयित दहशतवादी इसीस गटाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसापासून गुजरात एटीएसच्या उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा पोरबंदर आणि सूरतमध्ये तळ ठोकून आहे. एटीएसचे पोलीस महानिरीक्षक दीपन भद्रन यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एटीएसने सुमेरा नावाच्या संशयित महिलेला लालगेट परिसरातून पकडले आहे. सध्या सुमेराला पोरबंदरला नेण्यात आले आहे.
सलग सहा तास सुरू होती चौकशी :एटीएसने सुमेराला पकडल्यानंतर सलग सहा तास तिची चौकशी सुरू होती. तीन वाजता पोलीस सुमेराला घेऊन गेले. एटीएस आणि सूरत गुन्हे शाखेने सुमेराचा बराच शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुमेराचा अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर सुमेरा कुटुंबासह सूरतमध्ये स्थायिक झाली होती.
सुमेरा दोन मुलांची आई : सुमेराच्या कुटुंबात दोन मुले आहेत. यापूर्वी इराणमधून सुमेरा अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन ती भारतात किंवा अन्य देशात जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली होती.
सुमेराचा दक्षिणेत विवाह : सुमेराचा विवाह दक्षिण भारतात झाला आहे. सुमेराच्या कुटुंबातील एक सदस्य सरकारी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात एटीएसने पोरबंदर येथून इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत या दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 जणांना ताब्यात घेतले. चौकशीत सुमेराचे नाव समोर आले असून तिच्याकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुमेराकडून चार मोबाईलही सापडले आहेत. ती दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कशी आली? या प्रश्नाचे उत्तर एटीएस शोधत आहे. यासह एटीएसने पोरबंदर येथून 3 संशयितांना अटक केली आहे. एटीएसच्या चौकशीत तिघांनीही सुमेराचे नाव सांगितले आहे.
चार जणांच्या आवळल्या मुसक्या :या प्रकरणी गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमधून चार संशयितांना अटक केली आहे. या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या संशयितांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी एटीएसच्या पथकाने एक दिवस आधीच त्यांना अटक करण्यासाठी पोरबंदरमध्ये तळ ठोकला होता.
इसीस कनेक्शन : अटक करण्यात आलेले चार जण ISIS गटाचे सदस्य आहेत. याशिवाय छापेमारीत अनेक प्रतिबंधित वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्वजण गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते. याआधी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मध्य प्रदेशात ISIS शी संबंधित तीन जणांना नुकतीच अटक केली होती. सय्यद ममूर अली, मोहम्मद आदिल खान आणि मोहम्मद शाहिद अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.