हैदराबाद : हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की, चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हे गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो
का साजरा केला जातो : गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाला सुरुवात होते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? :गुढीपाडवा विशेषत: महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखविला जाते.