बरनाला (पंजाब) - आधुनिकतेने माणूस आणि पुस्तक यांच्यातील दरी वाढवली आहे. मोबाइल क्रांतीने लोकांच्या ज्ञानात भर पडली हे खरे असले, तरी मानवी जीवनातील पुस्तकांचे महत्त्व कायम राहिले आहे. मात्र, दुर्दैवाने मोबाईलच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी पुस्तकांचे महत्त्व ओळखू शकत नाहीये. पुस्तके आणि तरुण पिढीतील ही दरी कमी करण्यासाठी पंजाब राज्यातील बरनाला येथील दिवाना गावातील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शहीद करतार सिंह यांच्या नावाने एक वाचनालय सुरू केले आहे. लोकांना वाचन करण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी सर्व प्रकारची पुस्तके याठिकाणी उपलब्ध करुन दिली जातात. याशिवाय या तरुणांनी गावातील भिंतींवर विविध प्रकारच्या ग्राफिटी काढल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते लोकांना पुस्तकांचे महत्त्व सांगतात. या उपक्रमामुळे लोक या वाचनालयाकडे आकर्षित होत आहेत.
गावातील भिंतीवर काढण्यात आल्यात ग्राफिटी
गावातील भिंतींवर काढण्यात आलेल्या ग्राफिटींमध्ये महान लेखक आणि कवींच्या शब्दांनाही स्थान देण्यात आले आहे. याद्वारे पुस्तकांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. भिंतींवर कवी पाश यांचे क्रांतिकारी शब्द आणि प्रसिद्ध लेखक मॅक्सिम गॉर्की यांच्या विचारांसह बाबा नाजमी यांच्या कविता लिहिण्यात आल्या आहेत. याशिवाय शहीद करतार सिंह यांची पेंटिंग सर्वांना आकर्षित करत आहे. तरुणांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.