नवी दिल्ली :देशभरात टोमॅटोच्या किमतीने हाहाकार उडाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटोच्या किमती 80 रुपयांवरून आता 70 रुपये प्रति किलो केल्या आहेत. नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) मार्फत केंद्र सरकार दिल्ली आणि इतर काही प्रमुख शहरांमध्ये 80 रुपये किलोच्या अनुदानित दराने लोकांना टोमॅटो विकत आहे.
प्रमुख शहरात टोमॅटोचे दर भिडले गगणाला :टोमॅटोच्या किरकोळ किमती 120 रुपये किलोच्या आसपास आहेत. तर काही ठिकाणी टोमॅटो 245 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. राजधानी दिल्लीत टोमॅटोचा दर 120 रुपये प्रति किलोवर आला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने NCCF आणि NAFED ला 20 जुलै 2023 पासून 70 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची किरकोळ विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. टोमॅटोच्या किमतीतील घसरलेला कल लक्षात घेऊन हा दर निश्चित करण्याचे ठरवण्यात आल्याचे जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दर 70 रुपये केल्यामुळे गृहिणींना फायदा :केंद्र सरकारने NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला 90 रुपये प्रति किलो दराने विकले गेले होते. केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानित टोमॅटोचे दर 16 जुलै 2023 पासून 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आले. त्यानंतर आता सरकारने टोमॅटो 70 रुपये प्रति किलो दर केल्याने ग्राहकांना आणखी फायदा होईल, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या निर्देशानुसार NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटोची एकाच वेळी खरेदी सुरू केली होती.