नवी दिल्ली -देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच असून भारतातील नागरिक मोठी लढाई लढत आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. परंतु कोरोना कालावधीत लसीची वाढती मागणी होत असतानाही देशात लसीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीअभावी लक्ष्य केले.
प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले की, "भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने 12 एप्रिल रोजी लसीचा उत्सव साजरा केला, परंतु लसींची व्यवस्था केली नाही अर्थात पूरवठा केला नाही. गेल्या 30 दिवसांत देशात लसीकरण दर 82 टक्क्यांनी घसरला आहे", असे त्या म्हणाल्या.
"मोदी यांनी लस उत्पादक कारखान्यांना भेट दिली. छायाचित्रेही घेतली, परंतु जानेवारी 2021 मध्ये सरकारने प्रथम लस ऑर्डर का दिली नाही, अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लसी कंपन्यांना खूप पूर्वीपासून ऑर्डर दिली होती." याची जबाबदारी कोण घेणार? ", असा सवाल प्रियंका यांनी केला. घरोघरी लसीकरण गरजेचे आहे. असे नाही केले तर कोरोनाशी लढा देणे अशक्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट'वरून मोदींवर टीका -
यापूर्वी प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट'वरूनभाजप सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांसाठी नवीन संसद बांधण्याऐवजी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संसाधने वापरली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, अशी टीका भाजपा सरकरावर केली होती.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लशींचा तुटवडा -
महाराष्ट्रात लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात राज्यात लसींचा मोठा तुटवडा आहे. सध्या राज्याला खूप कमी प्रमाणात राज्याला लसी उपलब्ध होत आहेत. त्यातच केंद्र सरकारने राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत 45 वयोगटाच्या वरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहीम राज्य सरकार सुरू ठेवणार आहे. या मोहिमेअंतर्गत 45 वयोगटाच्या वरील पाच लाख लोकांना दुसरा डोस देणे बाकी आहे.
हेही वाचा -भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज