मुंबई Govind Ballabh Pant : भारतरत्न पंडित गोविंद बल्लभ पंत यांची आज १३६ वी जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं. स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते तुरुंगातही गेले आहेत. ते उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. तसेच ते भारताचे गृहमंत्रीही राहिले आहेत. ते पेशानं वकील होते. कुशल राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाची ओळख करून घेऊया.
उत्तराखंडमध्ये जन्म : भारतरत्न पंडित गोविंद बल्लभ पंत यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील खुंट गावात झाला. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनोरथ पंत आणि आईचे नाव गोविंदीबाई होते. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. तर आई गृहिणी होती. १८९९ मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचा गंगा देवीशी विवाह झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण १८९७ साली रामजे महाविद्यालयातून सुरू झालं. पंत अभ्यासात खूप हुशार होते. त्यामुळेच ते सर्व शिक्षकांचे लाडके होते.
कायद्याची पदवी प्राप्त केली : बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अलाहाबाद विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी १९०७ मध्ये राजकारण, गणित आणि इंग्रजी साहित्य या विषयांत बीए केलं. १९०९ मध्ये त्यांनी कायद्याची सर्वोच्च पदवी प्राप्त केली. इतकंच नाही तर कॉलेजतर्फे त्यांना लम्सडेन पुरस्कारही देण्यात आला. यानंतर ते १९१० मध्ये अल्मोडा येथे परतले. इथे त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली.
असहकार आंदोलनात भाग घेतला : गोविंद बल्लभ पंत विद्यार्थी दशेत महात्मा गांधींच्या संपर्कात आले. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात सामील झाले. डिसेंबर १९२१ मध्ये त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनात भाग घेतला. ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडलेल्या काकोरी घटनेत त्यांनी क्रांतीकारकांची बाजू घेतली. एवढेच नाही तर त्यांनी क्रांतीकारकांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.