नवी दिल्ली : देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सध्या कोणत्याही राज्याचे राज्यपाल करण्यात आलेले नाही.
गुलाबचंद कटारिया आसामचे राज्यपाल : राजस्थानमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे लक्ष्मण आचार्य, शिव प्रताप शुक्ला, सीपी राधाकृष्णन यांची अनुक्रमे सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची अधिसूचना राष्ट्रपतींनी जारी केली आहे. यामध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे नवे महामहिम राज्यपाल बनवण्यात आले आहे. तर विद्यमान राज्यपाल फागू चौहान यांची नियुक्ती मेघालयला करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे एलजी राधाकृष्ण माथूर यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. रमेश बैस हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते.