नवी दिल्ली -देशातील डेटा संरक्षण कायदा अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे, तर सध्याच्या विधेयकाने मोठ्या टेक कंपन्यांना चिंतेत टाकले होते. अनेक नागरी समाज गटांनीही विधेयकातील काही तरतुदींवर टीका केली. सरकारने सध्या हे विधेयक ( Data Protection Bill ) मागे घेतले आहे.
सरकारने बुधवारी वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक ( Personal Data Protection Bill ) मागे घेतले. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ( Minister Ashwini Vaishnav ) यांनी हे विधेयक मागे घेतल्याची माहिती दिली. संसदेच्या संयुक्त समितीने (JPC) विधेयकाच्या तपशीलांची छाननी केली आणि 81 दुरुस्त्या आणि 12 शिफारशी प्रस्तावित केल्या. हे सर्व प्रस्ताव डिजिटल इकोसिस्टमच्या कायदेशीर चौकटीसाठी देण्यात आले आहेत. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, संयुक्त संसदीय समितीच्या अहवालानुसार, सविस्तर कायदेशीर चौकटीवर काम सुरू आहे. या परिस्थिती लक्षात घेऊन, 'वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, 2019' मागे घेण्याचा आणि व्यापक कायदेशीर चौकटीशी सुसंगत नवीन विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव आहे.