नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना सरकारी नोकरीचे बंपर गिफ्ट दिले आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी आणि इतर संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या तब्बल 70 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत.
देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावा :देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाला पाठिंबा देत, केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या केल्या जात आहेत. आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय अशा देशभरातून निवडलेल्या नवीन भरती, लेखापरीक्षण, लेखा विभाग आणि गृह मंत्रालय आदींसह विविध विभागांमध्ये सरकारी सेवेत हे तरुण सहभागी होणार आहेत.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य :रोजगार मेळा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करणार आहे. तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी या रोजगार मेळाव्यामुळे अर्थपूर्ण संधी प्रदान करणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.