गोरखपूर (उत्तर प्रदेश) Gorakhpur Kushinagar Highway Accident : उत्तर प्रदेशातील गोरखपूर कुशीनगर महामार्गावर जगदीशपूरजवळ एका भरधाव ट्रकनं दोन बसला मागून धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना पाच रुग्णवाहिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील काही जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच एसपी सिटी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सदर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांशीही रुग्णांबाबत चर्चा केली. यानंतर आणखी डॉक्टरांनाही अपघातस्थळी बोलावण्यात आलं. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रस्त्यावर उभ्या बसला ट्रकची धडक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून रोडवेज कॉन्ट्रॅक्ट बस प्रवासी घेऊन पारौनाकडे जात होती. जगदीशपूरमधील मल्लापूरजवळ बसचं चाक पंक्चर झालं. यामुळं चालकानं बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तसंच कंडक्टरनं दुसरी बस मागवली होती. गोरखपूरहून आलेल्या रिकाम्या बसमध्ये प्रवाशांना बसवले जात होते. काही प्रवासी आधीच बसमध्ये चढले होते. यावेळी दोन्ही बसमध्ये अनेक लोक उभे होते. याचवेळी पाठीमागून भरधाव ट्रकनं या बसला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसचं चाक दोन जणांवर गेल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे 27 जण जखमी झाले आहेत. यातील 12 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.