लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये ३ मार्चला कथित दहशतवादी आढळल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राहत असलेल्या गोरखनाथ मठात अहमद मुर्तझा अब्बासी ( Ahmad Murtaza Abbasi ) याने सुरक्षेत तैनात असलेल्या तीन जवानांवर धारदार शस्त्राने ( Gorakhnath temple attack ) हल्ला केला. यावेळी त्याने जोरदार धार्मिक घोषणाही केल्या होत्या. यूपी सरकारने हा दहशतवादी कट असल्याचे सांगत या प्रकरणाचा तपास यूपी एटीएसकडे सोपविला त्यानंतर माहिती समोर आली आहे.
अटकेतील मुर्तजा हा झाकीर नाईकचा अनुयायी ( Murtaza Abbasi follower of Zakir Naike ) आहे. तसेच त्याचे देवबंदशी संबंध जोडलेले ( Murtaza Abbasi Deoband link ) दिसत आहेत. सध्या एटीएसने मुर्तजाला लखनौ मुख्यालयात आणले आहे. आता येथे त्याची पुढील चौकशी होणार आहे.
झाकीर नाईकच्या भाषणांच्या अनेक लिंक वेब सर्च हिस्ट्रीमध्ये -गोरखनाथ मठात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारा मेकॅनिकल इंजिनियर अहमद मुर्तझा अब्बासी यूपी एटीएसच्या ताब्यात आहे. एटीएससमोर मुर्तझा स्वत:ला अल्लाहचा सेवक असल्याचे सांगत आहे. मुर्तजाकडे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये झाकीर नाईकच्या भाषणांच्या अनेक लिंक वेब सर्च हिस्ट्रीमध्ये सापडल्या आहेत. एवढेच नाही तर मुर्तजाच्या लॅपटॉपमध्ये सीरिया आणि आयएसशी संबंधित व्हिडिओही सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मुर्तझाला जिहादी व्हिडिओ पाठवणारा कोणीतरी दहशतवादी होता. गेल्या दोन वर्षांपासून मुर्तझा हा घरातील एका खोलीत एकटाच राहत होता. तो मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये जिहादी व्हिडिओ पाहत असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका षड्यंत्राखाली मुर्तझा अब्बासीचे ब्रेनवॉश केले जात होते.
व्हिडिओ पाहून त्याचे ब्रेनवॉश-मुर्तझा अब्बासी धार्मिक स्थळांची रेकी करण्यासाठी नेपाळ, बुद्धगया, कपिलवस्तुसह अनेक ठिकाणी गेला होता. मुर्तजाचे इतर धर्म आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांशी काही विशेष आकर्षण नव्हते. तर जिहादशी संबंधित व्हिडिओ पाहून त्याचे ब्रेनवॉश करणाऱ्यांकडून त्याला तसे आदेश दिले जात होते. यूपी एटीएसला याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाही. असे असले तरी सूत्रांचे म्हणणे आहे की अनेक पुरावे या एजन्सीच्या हाती लागले आहेत.
व्हिडिओ दाखवून त्यांना भडकावायचे-बॉम्बे आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेला अहमद मुर्तझा अब्बासी गोरखपूरशिवाय मुंबई, गुजरात येथे राहिला आहे. तो कधी पश्चिम यूपीला गेला होता की नाही हे यूपी एटीएस आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच यूपी एटीएसने इनामुल हक याला देवबंदमधील वसतिगृहातून अटक केली. इनामूलचे यूपीमध्ये एकच काम होते की त्याने निरपराध तरुणांना पाकिस्तानमधून पाठवले जाणारे जिहादशी संबंधित व्हिडिओ दाखवून त्यांना भडकावायचे होते.